अण्णा भाऊ साठे यांच्या " आवडी " वर येत असलेला " इभ्रत " हा मराठी सिनेना पहिला नसून दुसरा आहे
कादंबरीवरून सिनेमा बनवणं तसं कठीण काम असते.परंतू कादंबरीवरून मराठीत अनेक सिनेमे आले,येत आहेत व येत राहतील.आलेल्यांतील काही स्मरणात राहिले आहेत.तर काहींना प्रेक्षकांनी केंव्हाच विसरलं आहे.कादंबरी तथा साहित्यकृतीत शब्द बोलतात,तर सिनेमात(चित्रपटात) ध्वनीमुद्रीत शब्द व कॅमे-यात बंदिस्त झालेलं चलचित्र.सिनेमा हा शब्द व कलेस विज्ञानाची जोड देऊन मानवी भूमीकांना प्रेक्षकांपुठे जीवंत करणारा एक कलाविष्कार आहे. या कलाविष्काराचा समाज जीवनात उपयोग होणे तेवढेच गरजेचे असते.ज्या साहित्यकृतीत समाजव्यापी अजोड शब्दाविष्कार असतो व त्या शब्दाविष्कारांना चित्रकृतीत तेवढ्याच ताकतीने उतरविल्या जाते अशा कलाविष्काराचा सिगनेमा नक्कीच स्मरणात राहतो.अनेक साहित्यीकांच्या साहित्यात असा अजोड शब्दाविष्कार पहायला मिळतो. परंतू त्या साहित्यी'कांतील एक नाव आवर्जुन घ्यावं असे थोर साहित्यीक म्हणजे साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे. साहित्यरत्न सत्यशोधक अण्णा भाऊ साठे म्हणतात," कलेसाठी जीवन नसून जीवनासाठी कला आहे." जी कला समाज जीवनोपयोगी असते तिच चिरंतर अविस्मरणीय ठरते.सत्यशोधक अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यात गोर-गरीब, शेतकरी, शेतमजूर,श्रमिक, दलित- पददलित,स्त्री हक्क, स्वातंत्र्य,आदींच्या व्यथा-वेदना, संवेदना व भावना प्रकर्षानं उमटलेल्या आहेत.म्हणूनच साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या कथा कादंब-यांतील शब्दाविष्काराच्या पटकथेने सजलेल्या काही सिनेमांनी समाजमनावर कायमचे स्थान स्थापलेले आहे.आणि अशातच २१ फेब्रुवारी २०२० रोजी त्यांच्या 'आवडी' या समाजव्यापी साहित्यकृती शब्दाविष्काराच्या पटकथेने सजलेल्या कलाविष्काराचा "इभ्रत " हा मराठी सिनेमा येत आहे.आणि तो पाहण्याची उत्सुकता मला ही तेवढीच निर्माण झाली आहे.
अण्णा भाऊ साठे यांच्या " आवडी " वर येत असलेला " इभ्रत " हा मराठी सिनेना पहिला नसून दुसरा आहे
नारायण हरी आपटे यांच्या भाग्यश्री या कादंबरीवरून १९३४ साली ‘‘अमृतमंथन’’, तर १९३७ साली कादंबरीवरुन पहिला सिनेमा आला 'कुंकू'.नारायण हरी आपटे याच्या ‘न पटणारी गोष्ट’ या कादंबरीवर आधारित हा सिनेमा होता. १९४८ साली त्यांच्याच ‘पाच ते पाच’ या कादंबरीवर ‘‘भाग्यरेखा’’ हा सिनेमा बनवण्यात आला.यानंतर कांदबरीचे सिनेमॅटीकरण सुरू झाले व कादंबरीवरून सिनेमे आगामी काळातही आपल्याला पाहायला मिळतील.कारण...
मनोरंजन व प्रबोधनाच्या अनेक उत्तम साधानांपैकी एक म्हणजे सिनेमा आहे.आपल्या इंडस्ट्रीमधल्या लेखक-दिग्दर्शक, कलाकार यांनी हे आव्हान स्वीकारत सिनेमा यशस्वी करून दाखवला आणि पुढे दाखवतील पण.गेल्या काही वर्षापुर्वी प्रदर्शित झालेला ‘‘बर्नी’’ हा सिनेमा प्रा. सुभाष भेंडे यांच्या ‘जोगीण’ या कादंबरीवरील आहे.मैत्रीची एक अनोखी परिभाषा शिकवली ती सुहास शिरवळकर यांच्या दुनियादारी या कादंबरीने.या कादंबरीने जेवढं वेडं लावलं अगदी तितकंच या कादंबरीवरच्या सिनेमाने केलं. संजय जाधव दिग्दर्शित ‘‘दुनियादारी’’ सिनेमाने मराठी सिनेसृष्टीत एक वेगळाच आयाम घातला.तर लहान मुलांचे आवडते साने गुरुजी यांच्या ‘श्यामची आई’ या पुस्तकावरून १९५३ साली ‘‘श्यामची आई’’ हा सिनेमा बनवण्यात आला. प्रल्हाद केशव अत्रे यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केले असून पहिला राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारा हा सिनेमा आहे.श्री.ना.पेंडसे यांच्या ‘गारंबीचा बापू’ या कादंबरीवरील ‘‘गारंबीचा बापू’’ हा सिनेमा,तसेच डॉ.श्रीराम लागू यांच्या अप्रतिम अभिनयाचे दर्शन घडवून जाणणारा ‘पिंजरा’ हा सिनेमा प्रोफेसर गोर्बेज या जर्मन कादंबरीवर आधारित आहे. ‘‘सिंहासन’’ हा मराठी सिनेसृष्टीतील मैलाचा दगड ठरलेला सिनेमा आहे.१९७९ साली प्रदर्शित झालेला हा सिनेमा अरुण साधू यांच्या मुंबई दिनांक व सिंहासन या कादंब-यांतील निवडक प्रसंगावर आहे.डॉ. श्रीराम लागू,निळू फुले,अरुण सरनाईक,रिमा लागू,मधुकर तोरडमल,नाना पाटेकर तसेच सतीश दुभाषी यांच्या दमदार अभिनयाने हा सिनेमा प्रेक्षकांनी उचलून धरला होता. राजकारणावर आधारित असलेल्या या सिनेमाचे दिग्दर्शन जब्बार पटेल यांनी केलं आहे. स्मिता पाटील या अभिनेत्रीचे आजही प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान आहे.१९८२ साली स्मिता पाटील यांचा ‘‘उंबरठा’’ हा सिनेमा खूप गाजला.शांता निसळ यांच्या ‘बेघर’ या कादंबरीवरील हा सिनेमा असून या सिनेमाचं दिग्दर्शन जब्बार पटेल यांनी केलं होतं.
१९९१ मध्ये आलेल्या ‘‘चौकट राजा’’ या सिनेमाने आपल्या एका वेगळ्याच जगाची सफर घडवून आणली.अशोक पाटोळे यांच्या ‘बोन्साय’ या कादंबरीवरील हा सिनेमा आहे.यानंतर ‘ही श्रींची इच्छा’ हा उद्योजक श्रीनिवास ठाणेकर यांच्या कादंबरीवरील सिनेमा २००६ रोजी प्रदर्शित झाला.पैशाच्या हव्यासापोटी माणूस कोणत्या थराला जाऊ शकतो याचे चित्रण ‘‘धुडगूस’’ या सिनेमात केले गेले आहे.राजन खान यांच्या ‘‘युद्ध’’ या कादंबरीवरील हा सिनेमा आहे.तर सुजय डहाके यांचा ‘‘शाळा’’ हा सिनेमा मिलिंद बोकील यांच्या कादंबरीवर आधारलेला आहे. कादंबरीवरून निर्मिलेल्या सिनेमांची यादी फार मोठी आहे. यात राजन खान यांच्या कादंबरीवरील ‘‘सत ना गत’’ हा सिनेमा,रमेश इंगळे-उत्रादकर यांच्या ‘‘निशाणी डावा अंगठा’’ या कादंबरीवरील सिनेमा,सचिन खेडेकर आणि तनुजा अभिनित ‘‘पितृऋण’’ हा सिनेमा सुधा मुर्ती यांच्या कादंबरीवरील सिनेमा होता.
तमाशा या कलेकडे आजही शाशंकतेने पहिले जाते.या तमाशाच्या रंगमंचाला एक वेगळेपण मिळवून दिला तो नटरंग या कादंबरीने.रवी जाधव यांच्या ‘नटरंग’ या सिनेमाने २०१० साली प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका चुकवला.आनंद यादव यांनी ‘‘नटरंग’’ या कादंबरीत गुणा कागलकर ह्या तमाशा कलावंताची कथा सांगितली आहे.तर ‘‘सैराट’’ या सिनेमाने रेकॉर्ड ब्रेक कमाई केली, नाथ माने या लेखकाने हा सिनेमा त्याच्या ‘‘बोभाटा’’ या कादंबरीवरून घेतल्याचा आरोप केला आहे. २०१० मध्ये लिहिल्या गेलेल्या या कादंबरीची प्रस्तावना द.मा.मिरासदार यांनी लिहिली आहे.अशा आदी कादंब-यांवर तमाशा व भावनाप्रधान सिनेमा आलेत आणि आगामी काळात आपल्याला आणखी असे अनेक सिनेमा पाहायला मिळतील.
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे हे नाव अर्वाचीन मराठी साहित्याच्या इतिहासात अनेक अर्थांनी महत्त्वपूर्ण आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे.भारतीय समाजव्यवस्थेत व मराठी साहित्यात तळागाळातला माणूस कधीच साहित्याचा विषय झाला नव्हता,तो अण्णा भाऊंच्या साहित्याचा विषय झाला. त्यांनी जे पाहिले,अनुभवले,तेच आपल्या लेखणीतून मांडले. त्यांच्या साहित्यातून येणारी माणसे गुन्हेगार असली,तरी नितीमान,स्वाभिमानी आहेत. त्यांना गुन्हेगार बनविणाऱ्या समाजव्यवस्थेच्या मर्मावर अण्णा भाऊ साठेंनी घाव घातला. त्यामुळे साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांनी लिहलेल्या वास्तववादी कादंब-यांवर आलेल्या सिनेमांची बातच वेगळी. प्रेक्षकांच्या मनावर त्यांची वेगळीच छाप आजही आहे. ‘‘वैजयंता’’ हा अण्णा भाऊ साठे यांच्या ‘वैजयंता’ या कादंबरीवरील सिनेमा असून त्याला १९६२ सालचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.तमाशात काम करणा-या स्त्रियांकडे समाज चांगल्या नजरेने पाहत नाही. समाजातील हीच वास्तवता या सिनेमात दाखवण्यात आली होती.साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्याच ‘फकिरा’ या कादंबरीवरून १९६३ साली " फकिरा " या सिनेमाची निर्मिती करण्यात आली.कुमार चंद्रशेखर यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं.यानंतर त्यांच्या ‘आवडी’ तसे च ‘वारणेचा वाघ’ या कादंबरीवरून अनुक्रमे ‘‘टिळा लावते मी रक्ताचा’’ हा १९६९ साली तर ‘‘वारणेचा वाघ’’ हा १९७० साली प्रदर्शित करण्यात आला. तसेच 'चिखलातील कमळ 'या कादंबरीवर ' मुरळी मल्हारी रायाची ' हा सिनेमा १९६९ सालीच आला.साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या कादंब-यांवर ७ सिनेमा आले.चित्रा’ कादंबरीचं कन्नड,रशियन,पोलिश भाषांत झालेलं भाषांतर, ‘वारणेच्या खोऱ्यात’ कादंबरीचं गुजराती भाषेत पदार्पण, ‘फकिरा’च्या हिंदी व पंजाबी भाषांतील आवृत्त्या प्रसिद्ध झाल्या.अलगुज कादंबरीवर 'अशी ही साताऱ्याची तऱ्हा', आवडीवर ' टिळा लावते मी रक्ताचा ', माकडीचा माळ - 'डोंगरची मैना ', फकिरा कादंबरीवर 'फकिरा',चिखलातील कमळ वर ' मुरळी मल्हारी रायाची ',वारणेचा वाघ वर 'वारणेचा वाघ ' बारा गावचे पाणी आणि वैजयंता कादंबरीवर ' वैजयंता '.असे एकापेक्षा एक आकर्षक,प्रबोधक, संदेशात्मक सिनेमा आले.यातून साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या अष्टपैलू प्रतिभेचा साहित्यसंसार,अजोड शब्दाविष्कार पहावयास मिळतो.
साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या " आवडी " या कादंबरीवर येत असलेला " इभ्रत " हा मराठी सिनेमा पहिला नसून दुसरा आहे. या अगोदर " टिळा लावते मी रक्ताचा " हा सिनेमा आलेला आहे.इभ्रत मध्ये मल्हार - मायडीची प्रेमतथा रंगविण्यात आल्याचे बोलल्या जात आहे. त्यामुळे ' टिळा लाविते मी रक्ताचा ' अर्थात आवडीचे स्मरण होणे ही गरजेचे आहे.साहित्यरत्न सत्यशोधक अण्णा भाऊ साठे यांची ' आवडी ' ही कादंबरी प्रेमविवाहाचं एक उत्तम उदाहरण आहे.तसेच स्त्री ही या समाजव्यवस्थेत वर्षानुवर्षे कुजत पडलेली असली तरी तिलाही एक मन आहे व तीही एक माणूस आहे हे यातून ते सांगतात.तसेच ' चिखलातील कमळ ' या कादंबरीवर 'मुरळी मल्हारी रायाची' हा सिनेमा देखील रुढी परंपरेत गुरफटलेल्या व्यवस्थेत प्रेमरुपी स्त्री मनाची कुचंबना दर्शविते.अण्णाभाऊंची ‘आवडी’ ही एक सत्यकथा आहे.ती तांदूळवाडीत घडलेली कथा आहे...
आवडीच्या प्रस्तावनेत अण्णा भाऊ साठे म्हणतात,‘माझी माणसं मला कुठंना कुठं भेटलेली असतात.त्यांचे जगणं,मरणं मला ठाऊक असते.आवडीचे प्रेत गोरीतून काढले,तेव्हा मी गोरीजवळ हजर होतो.प्रचंड देहाचा धनाजी काखेत लुगडे, चोळी घेऊन रडत होता.त्याला आवडीची एक चेपली मिळाली. तेव्हा तो लहान मुलासारखा रडू लागला.त्या प्रसंगाचा माझ्या मनावर खोल परिणाम झाला. आवडीचं जीवन माझ्या प्रतिभेत एकरूप झाले.’
आवडीची लग्नामध्ये फसवणूक होते.तिच्या नवऱ्याला फेफरं येत असलेलं तिचा भाऊ नागोजी तिच्यापासून लपवून ठेवतो. सासरी जेव्हा तिला कळतं, त्यावेळी तिचं मन दुःखानं होरपळून जातं.भावानं मला फसवलं याचं शल्य तिला सतत बोचत राहतं.तिच्या सासरी येणाऱ्या धनाजी रामोशावर तिचं प्रेम बसतं व ती त्याच्यासोबत पळून जाते.सुखाचा संसार करीत असते.आवडीचं हे बंड अभूतपूर्व आहे.धनाजी तिच्यावर जिवापाड प्रेम करतो व गावाविरुद्ध लढण्यास तयार होतो.आवडीचा सख्खा भाऊ नागोजी सुडानं पेटून उठतो व दगाबाजीनं तिचा खून करतो.नागोजी बारा वर्षांची सजा भोगून तुरूंगातून बाहेर येतो,तेव्हा त्याला कुणीही आसरा देत नाही. तो धनाजीच्या भीतीने सतत पळत असतो.सर्वजण नागोजीस तू गैर वागलास म्हणून हिणवतात. त्याला त्याचं जगणं असहाय होतं. ज्या जागी त्यानं आवडीला ठार मारलं होतं,त्याच जागी धनाजी त्याचं शीर धडापासून वेगळं करतो. आवडी ही कादंबरी ग्रामीण कुटुंबामध्ये स्त्रियांच्या सुखस्वप्नाचा कसा चुराडा होतो,हे दाखवते.आणि यीत तेवढ्याच ताकतीने अंजनी तारकर, इनामदार,जयमाला काळे,जयश्री गडकर,डॉ.शिंदे,पुष्पा भोसले, बर्ची बहाद्दर,मधु गायकवाड, माणिकराज,रजनी केमकर, राजशेखर,राजा मयेकर,विश्वास कुंटे,शंकर कवठे,शांता तांबे, सूर्यंकांत या कलाकारांनी आपल्या कलाविष्काराने भूमीका जीवंत साकारल्यात!
सन १९६९ मध्ये उपरोक्त पटकथेवर आधारीत ' टिळा लाविते मी रक्ताचा ' हा सिनेमा आला.तर याच वर्षी अण्णा भाऊ साठेंच्या 'चिखलातील कमळ ' कादंबरीतील ....तुरुंगाबाहेर पडताच बळी खंडोबाच्या जत्रेला जातो.तो जात असतानाच सीताला गाडीच्या अपघातातून वाचवतो.जिवावरला अपघात टळल्याबद्दल सीता त्याला पालीच्या जागराचं आमंत्रण देते. सीतावर नजर ठेवून असलेला म्हादू पाटीलही तिथे आगंतुकपणे हजर होतो आणि सीताला पळवायचा घाट घालतो.बळीचा काटा काढण्यासाठी बळीनं सीता पळवली अशी अफवा म्हादू उठवून देतो.बळीला पकडून नेतात.पण बळी फरारी होतो.तो सीताला म्हादुच्या तावडीतून सोडवतो.म्हादू पुढेही बळीवर अनेक डाव टाकतो.पण बळी सुटतो.तरीही बळी आणि सीताचं मिलन होऊ शकत नाही.कारण सीता ही मुरळी असते व मुरळीचा जन्म देवाच्या पूजेसाठी असतो. एकूणच स्त्री हक्काची कुचंबना करणा-या वास्तववादी कथानकावर आधारीत पटकथेवर 'मुरळी मल्हारी रायाची ' हा सिनेमा साकारला आहे.या दोन्ही सिनेमात सौंदर्य व संदिग्धता, प्रेमातली निरागसता व जगण्यातलं वास्तव आणि मनाला चटका लाऊन जाणारा शेवट पहावयास मिळतो.हाच अनुभव ' सैराटच्या ' पटकथेतून पहावयास मिळाला.परंतू यातील पटकथा पौगंडावस्थेतील हुकमी प्रेमकहाणी सांगून जाते.या सिनेमांतून ऑनर किलींगचा प्रकार ही पहावयास मिळतो.परंतू ' टिळा लाविते रक्ताचा ' व 'मुरळी मल्हारी रायाची ' या सिनेमाची बातच काही वेगळी.म्हणूनच हे दोन सिनेमा प्रेक्षकांच्या मनावर १२ वर्ष ६ महिने अधिराज्य करुन गेले.
साहित्यरत्न आण्णा भाऊ साठे यांच्या ' आवडी ' या कादंबरीवर ' इभ्रत ' ही प्रेमकथा रंगणार आहे. टिळा लाविते मी रक्ताचा नंतर ' आवडी ' या प्रेमकथवर आधारित सिनेमाची ' इभ्रत ' ही दुसरी निर्मिती होय. ‘इभ्रत’ या चित्रपटातून मल्हार आणि मायडी यांची प्रेमकथा रुपेरी पडद्यावर उलगडणार आहे.रांगडा पण हळव्या मनाचा कुस्तीपटू ‘मल्हार’ म्हणजेच संजय शेजवळ आणि सौंदर्यवती ‘मायडी’ म्हणजेच शिल्पा ठाकरेची ही प्रेमकथा ‘आवडी’ या कादंबरीवर आधारलेली आहे.संजय शेजवळ आणि शिल्पा ठाकरेची केमिस्ट्री ‘इभ्रत’ मध्ये चांगलीच रंगली असून मायडी तिच्या प्रेमाच्या जाळ्यात मल्हारला कसं अडकवते हे चित्रपटात पाहणं रंजक ठरेल.डॉल्फिन सिनेक्राफ्ट प्रस्तुत श्रुती वसंत दांडेकर निर्मित आणि प्रवीण रमेश क्षीरसागर दिग्दर्शित ‘इभ्रत’ सिनेमा २१ फेब्रुवारी २०२० रोजी प्रदर्शित होणार आहे.मल्हार आणि मायडीची प्रेमकथा खुलते की यात अडथळे येतात हे चित्रपट पाहिल्यानंतरच स्पष्ट होईल.
साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या अजोड शब्दाविशष्कारातून साकारलेल्या ' आवडी ' ची पटकथा,संवाद व गीतरचना संजय नवगिरे यांनी 'इभ्रत ' ला दिली आहे. साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या सुनबाई सावित्रीबाई मधूकर साठे यांच्या हस्ते व नातू गणेश भगत यांच्या उपस्थितीत मुंबई येथे नुकताच इभ्रतच्या गीत, संगीत, पोस्टर व ट्रिझरचे प्रकाशन झाले आहे.सिनेमा गृहातील रुपेरी पडद्यावर लवकर हा सिनेमा पहावयास मिळणार आहे.
अण्णा भाऊ साठेंच्या वैजयंता, माकडीचा माळ,चिखलातील कमळ,वारणेचा वाघ,अलगुज, फकीरा,आवडी या सात कादंबऱ्या मराठी भाषेत निघालेले चित्रपट सुपरहिट ठरले.यातील ४ चित्रपटांना विविध पारितोषिके देखील मिळाली.परंतू दुर्दैवाची एक बाब म्हणजे शुक्रवार,दि.१८ जुलै १९६९ रोजी ' आवडी ' या कादंबरीवर आधारीत 'टिळा लाविते मी रक्ताचा' हा सिनेमा मुंबईच्या सिनेमागृहात प्रदर्शित झाला.त्याच दिवशी साहित्यरत्न सत्यशोधक,विश्वसाहित्य भुषण अण्णा भाऊ साठे यांनी श्रमिकांची ही रंगभूमी कायमची सोडली व देह ठेवला.हा सिनेमा त्यांच्यासाठी शेवटचा ठरला. त्यांना तो पाहता आला नाही,परंतू त्यांच्या अजोड तथा दमदार शब्दाविष्काराने सजलेला हा सिनेमा आम्हास पाहता आला. आणि याच कादंबरीच्या कथानकावर आधारीत सिनेमाची दुसरी आवृत्ती 'इभ्रत' च्या रुपाने येत असल्यामुळे हा सिनेमा पाहण्याची माझी पण खुप उत्सुकता आहे.कारण संजय नवगीरे यांनी साकारलेल्या पटकथेच्या शब्दाविष्कारातून ' आवडी ' अर्थात ' इभ्रत ' ला त्यांनी कितपत न्याय दिला आहे ? हे मला पहायचे आहे व प्रेक्षकांनो, अण्णा भाऊ साठे प्रेमींनों आपण ही जरुर पहावे....आणि दोघांतील साम्य काय ? ते ठरवावे....